शेतकऱ्यांनो, सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबा- अभिमन्यू काळे

0
15

गोंदिया,दि.२५ : सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पोत सुधारते. या शेतीमुळे उत्पन्नात घट येत नाही. उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
२५ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत गट प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के.आर.सराफ, नाशिकचे प्रगतीशील शेतकरी एकनाथ हांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, मी सुध्दा एक शेतकरी असून माझ्याकडे देखील शेती आहे. या शेतीतून आंबा, सिताफळ यासह अन्य पिके घेतो. विशेष म्हणजे २००६ पासून मी देखील सेंद्रीय शेती करीत आहे. सेंद्रीय शेती करण्याचा माझा अनुभव अत्यंत चांगला असून पिकांवर रोगराई व किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे किटकनाशकांवर होणारा खर्च नगण्य आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाचे चांगले मार्केटिंग केले पाहिजे असे सांगून जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया येथे सेंद्रिय तांदुळाचे विक्री केंद्र तयार करावे त्याला चांगला भाव मिळेल. यासाठी आपण सहकार्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. चव्हाण म्हणाले, कमी खर्चात चांगली शेती सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून करता येते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन सेंद्रीय शेती करण्यासाठी त्यांना आग्रह करावा. यावेळी त्यांनी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.
श्री. सराफ यांनी सेंद्रीय शेतीमुळे खत व किडीवर होणारा खर्च वाचतो असे सांगितले. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचा बायोडाटा तयार करण्यात आला असून त्या शेतीतील मातीचे नमूने गोळा करुन त्याची तपासणी करण्यात आली आहे. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी निंबोळी व दशपर्णी अर्कचा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक येथील प्रगतीशील शेतकरी एकनाथ हांडे व गोरेगाव येथील कृषी सहायक आर.बी.सोरदे यांनी या प्रशिक्षणात उपस्थित शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम नियोजक वैभव मुंडले, कृषी पणन तज्ञ सचिन कुंभार यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गट प्रशिक्षण कार्यक्रमाला तिरोडा तालुक्यातील बिहिरीया, चिखली व माल्ही येथील सेंद्रीय शेती करणाऱ्या तीन गटांचे १५० शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कृषी सहायक यावेळी उपस्थित होते.