‘त्या’ सागवान तस्करांवर वन्यप्राण्यांच्या शिकारीचेही गुन्हे

0
7

गोंदिया दि.26: जिल्ह्याच्या संरक्षित वनक्षेत्रात सागवान वृक्षांची तस्करी करताना वनविभागाच्या हाती लागलेले पाचही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आता सागवान तस्करीतही ते अडकल्यामुळे सागवान तस्करीत अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍यांपर्यंत त्यांच्यामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोंदिया वन परिक्षेत्राच्या चमूचे नेतृत्व करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात दि.२३ व २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत राजेश श्यामराव मरस्कोल्हे (३५), निरंजन सदाशिव कुंभरे (३५), रवी कांतिलाल धुर्वे (३६), बाबुलाल सुखदेव भदाडे (३८) व नरेंद्र सुखराम सोनटक्के (३२) सर्व रा. धामनेवाडा यांना अटक करून त्यांच्यावर वनगुन्हा (जी/६२/१९, दि.२२/१0/२0१६) नोंद करण्यात आला आहे.
सदर आरोपींनी संरक्षित वनक्षेत्र (कक्ष क्र.४७) जुनेवानी बीट व (कक्ष क्रमांक ३६७) निमगाव (इंदोरा) बीटमध्ये सागवान वृक्षांची अवैध कटाई केली होती. या घटनेची माहिती गोंदिया वनक्षेत्र कार्यालयात मिळताच चमुने तत्काळ कारवाई करून सागाचे कापलेले वृक्ष व साहित्य जंगलातून जप्त केले. तसेच घटनास्थळावरून राजेश मरस्कोल्हे, निरंजन कुंभरे व रवी धुर्वे या तीन आरोपींना अटक केली. मात्र चौथा आरोपी बाबुलाल भदाडे पळून जाण्यात यशस्वी ठरला. ही कारवाई २३ ऑक्टोबरला करण्यात आली. सदर तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनकोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.
वनविभागाच्या चमुने दि.२४ रोजी चौथा फरार आरोपी बाबुलाल भदाडे व नरेंद्र सोनटक्के या दोघांना अटक केली. सोनटक्के याने सदर चारही आरोपींकडून सागवानची लाकडे विकत घेवून अवैध वृक्षतोडीस चालना देवून मदत केल्याने त्यालाही अटक झाली. सर्व पाचही आरोपींना २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर वन अधिनियम १९२७ च्या कलम ३२ (अ), ३३ (१) (अ) (एफ) (एच) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने पाचही आरोपींची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली.