23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ वादळासह अवकाळी पाऊस : निंबा परिसरात मोठे नुकसान

वादळासह अवकाळी पाऊस : निंबा परिसरात मोठे नुकसान

0
47

गोरेगाव,-. ग्राम पंचायत निंबा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शनिवारी अचानक आलेल्या चक्रीवादळासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षे उन्मळून पडली असून अनेक घरांवरील पत्रे, कवेलु, उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर वृक्ष पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य व शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात उन्हाळी हंगामात रब्बी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असताना अचानक आलेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या धान
पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये कापणीस आलेले धान आडवे पडले असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी ग्राम पंचायत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तलाठी, लाईनमन, वनविभागाचे कर्मचारी, वनरक्षक, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांना गावात बोलावून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत सरपंच वर्षाताई
विजय पटले यांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरांचे तसेच शेतकऱ्यांच्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व योग्य भरपाई द्यावी. ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तातडीने मदतकार्य राबवून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत निंबा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नुकसानाची पाहणी करतेवेळी प्रामुख्याने उपस्थित सरपंच वर्षाताई विजय पटले, उपसरपंच नंदलाल उईके, पोलीस पाटील माधव शिवणकर, पी. आर. कटरे, तलाठी दीक्षा वाकळे, वनरक्षक कुभरे, विद्युत विभागाचे लाईन मेन शशिकांत निपाने, व गावातील नागरिक उपस्थित होते.

blank