गोरेगाव,दि. 23 जून -तालुक्यातील आंबेतलाव येथे रविवार (दि. 21 जून) रात्री 11 वाजता अचानक लागलेल्या आगीमुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले.विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य, धान्य, कपडे तसेच विविध घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित कुटुंब आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेमराज पारधी यांच्या निवासस्थानी रविवारला रात्रि सुमारे 11 वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले. काही क्षणातच घराला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केले. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत घरातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले होते.घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली तसेच त्यांना धीर देत मदतीचा हात पुढे केला.भाजपा युवा मोर्चाचे जिल्हातिल सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपयांची रक्कम सुपूर्द केली. संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत युवा मोर्चाने दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मनोज बोपचे, तालुका अध्यक्ष रवि पटले, तालुका महामंत्री फनिद्रा पटले,नरेंद्र चौहान उपसरपंच लोकराम बघेले , ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा केवळ राजकीय संघटनात्मक कार्यापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारा परिवार आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा अन्य कोणत्याही संकटाच्या प्रसंगी गरजू नागरिकांच्या मदतीसाठी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात.
आंबेतलाव येथील या दुर्दैवी घटनेतही युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत तातडीने मदत उपलब्ध करून दिली.त्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, संकटकाळात मदतीला धावून येणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हेच समाजाचे खरे आधारस्तंभ असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.पीडित पारधी कुटुंबीयांनी देखील भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, कठीण प्रसंगी मिळालेली ही मदत आपल्यासाठी मोठा आधार ठरणार असल्याचे सांगितले.आंबेतलाव येथील ही घटना ग्रामीण भागातील कुटुंबांना अचानक येणाऱ्या संकटांची जाणीव करून देणारी ठरली असून, सामाजिक बांधिलकी जपत मदतीसाठी पुढे येणाऱ्या संघटनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





