भंडारा, तुमसर, पवनी व साकोली पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी

0
14

भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगर परिषद सदस्य आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी नगर परिषद निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भंडारा-गोदिया विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे यापूर्वीच अधिसूचना जारी झाली असली तरी नगर पालिका क्षेत्रासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची, तुमसर नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार डी.टी. सोनवणे यांची, पवनी नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांची तर साकोली नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच.डब्ल्यु. खडतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि नगर परिषद सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे १९ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान राहणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असून सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. नामनिर्देशन पत्र छाननी २८ नोव्हेंबर रोजी असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान होणार असून १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार आहे.

या नगर परिषद निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांची तर निवडणूक निरिक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.