बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणावर शिक्कामोर्तब

0
10

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणावर शासनाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे विकासाची दारे खुली झाली असून देशभरात मुख्य शहरात ये-जा करण्यासाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

२८६ हेक्टर जमीन बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडून विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर राज्य शासनाने याप्रकरणी पुढाकार घेत बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकासाची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविली आहे. केंद्र शासनाने बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास येत्या पाच वर्षांत हे विमानतळ पूर्ण होऊन येथून विमानसेवा सुरू होईल, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. बेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू झाल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवाशांना अमरावतीत ये-जा करणे सुकर होईल.

रात्रीचीही विमानसेवा

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टी ३२०० मीटर लांब तर ६० मीटर रुंद राहणार आहे. त्यामुळे प्रवासी विमानसेवा ही रात्रीलाही सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाचा विकास होत आहे. हल्ली विमानतळाच्या विस्तारीकरणात यवतमाळ एकरी मार्ग जोडण्याचा प्रस्ताव आहे. पाऊणेचार कि.मी. लांबीचा अ‍ॅप्रोच मार्ग थेट यवतमाळ मार्गाशी जोडला जाणार आहे. त्याकरिता १३.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दैनंदिन विमानसेवा सुरू होणार

विदर्भात कपड्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून अमरावती नावारुपास आली आहे. बेलोरा विमानतळावरुन सुरत-अहमदाबाद-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विमान कंपन्या येथून दैनंदिन विमान सेवा सुरू करतील, अशी माहिती बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.डी. पाठक यांनी दिली.