केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांची महत्त्वपूर्ण बैठक
गोंदिया= नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रस्ते, पूल, ROB तसेच वाहतूक सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित व नवीन विकास कामांबाबत खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांनी बैठक घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूकविषयक अडचणी, प्रलंबित कामे तसेच आवश्यक असलेल्या नवीन विकासकामांची माहिती देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार प्रफुल पटेल सातत्याने प्रयत्नशील असून, दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, राष्ट्रीय महामार्गांचे मजबुतीकरण व रुंदीकरण, उड्डाणपुलांचे बांधकाम, प्रलंबित उड्डाणपुलांच्या अडचणी तातडीने दूर करून बांधकामाला गती देणे, तसेच जिल्ह्यातील विविध रेल्वे उड्डाणपूल (ROB) प्रकल्पांची प्रक्रिया पूर्ण करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला तुमसरचे आमदार राजु कारेमोरे उपस्थित राहून तुमसर मोहाडी या भागाचे कामाबद्दल चर्चा केली तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 543, 287 व 753 वरील विविध प्रलंबित व प्रस्तावित कामांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये खैरलांजी-खापा, भंडारा शहरातील शास्त्री चौक-त्रिमूर्ती चौक तसेच शीतला माता मंदिर ते रेल्वे समतल क्रॉसिंगपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, भंडारा-तुमसर-बपेरा मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण, जांब येथे सुशोभीकरण व डिव्हायडर, खापा चौक व जाम येथे उड्डाणपूल, तसेच खैरलांजी – तुमसर तालुक्यातील-मोहाडी-भंडारा व तिरोडा-सालई खुर्द-मनसर मार्गावरील चारपदरी व सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 543 व 753 वरील विविध कामांनाही प्राधान्य देण्यात आले. यामध्ये आमगाव-देवरी व गोंदिया-आमगाव मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, गोंदिया पूर्व बायपासवरील अतिरिक्त रेल्वे उड्डाणपूल, गोंदिया-तिरोडा मार्गावरील बालाघाट टी-पॉईंट व काचेवाणी येथील ROB, तसेच महेक रेस्टॉरंटजवळील नाल्यावरील स्लॅबचे बांधकाम, गोंदिया-तिरोडा-सालई खुर्द-मनसर मार्गावरील प्रलंबित सिमेंट काँक्रीट रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय ते खमारीपर्यंत चारपदरी रस्ता, कोहमारा-गोंदिया मार्गाचे चौपदरीकरण तसेच सौंदळ येथील उड्डाणपूल, अंडरपास, स्लिप रोड, नाली व फुटपाथची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
बैठकीत झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मकता दर्शवित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांनी सुचविलेल्या विकासकामांबाबत तसेच प्रलंबित कामांधील आवश्यक त्या त्रुटी दूर करून दोन्ही जिल्ह्यातील विकास कामांमधील अडचणी व अपूर्ण कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.





