देवरी : शहरात दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार आता जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. बाजाराच्या दिवशी भाजीपाला विक्रेत्यांची पिकअप, ट्रक व इतर अवजड वाहने थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच पार्क केली जात असल्याने लहान मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आठवडी बाजाराच्या दिवशी शेकडो भाजीपाला विक्रेते आपली अवजड वाहने (पिकअप व ट्रक) जिल्हा परिषद कन्या शाळेच्या
परिसरात उभ्या करतात. जड वाहनांच्या गर्दीमुळे विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या आड दडलेल्या रस्त्यांवरून चालताना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दर मंगळवारी हीच परिस्थिती निर्माण होत असूनही नगरपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पालकांकडून केला जात आहे.
एकीकडे विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे शाळेच्या दारातच चालणाऱ्या या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई का केली जात नाही? प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तेव्हा आठवडी बाजाराच्या दिवशी कन्या शाळेच्या परिसरात अवजड वाहनांच्या पार्किंगवर तात्काळ बंदी घालावी, भाजीपाला विक्रेत्यांच्या वाहनांसाठी नगरपंचायतीने स्वतंत्र पार्किंग जागेची व्यवस्था करावी, शाळेच्या वेळेत पोलीस किंवा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत ठेवावी, असी मागणी नगर पंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे.





