28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ बोंडगावदेवी-खांबी मार्गावरील पुलाचे नुतनीकरण करण्याची मागणी

बोंडगावदेवी-खांबी मार्गावरील पुलाचे नुतनीकरण करण्याची मागणी

0
9

अर्जुनी मोरगाव-तालुक्यातील खांबी हे परिसरातील प्रमुख व महत्त्वाचे गाव असून बोंडगावदेवी-खांबी मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र या मार्गाच्या मध्यभागी असलेला पूल जीर्ण झाल्याने साकोली आगाराने या मार्गे सुरु असलेली बससेवा गेल्या महिनाभरापासून बंद केली आहे. परिणामी खांबीसह परिसरातील गावातील शाळकरी विद्यार्थी, वृद्ध, महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मानसिक त्रास आणि आर्थिक भूर्दड सहन करावा लागत आहे.लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पुलाच्या नुतनीकरणासाठी निधी व प्रशासकीय मंजुरी द्यावी. पुलाचे मजबूत बांधकाम करून पावसाळ्यातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी दूर करावी. तसेच या मार्गावरील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बोंडगावदेवी हे जिल्हा परिषद क्षेत्रातील महत्त्वाचे गाव असून येथे महसूल मंडळ कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बैंक, दवाखाना, कृषी केंद्र, संगणकीय सुविधा केंद्र व विविध प्रकारची दुकाने आहेत. याशिवाय पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेले माँ गंगा-जमुना देवस्थानही या परिसरात आहे. महाशिवरात्रीच्या काळात प्रतापगड यात्रेसाठी ये-जा करणाऱ्या भाविकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते.
साकोली, भंडारा, नागपूरला ये-जा करण्यासाठी कुंभीटोला, बाराभाटी, येरंडी, ब्राह्मणटोला, चापटी, पिंपळगाव, खांबी, बोंडगांवदेवी या मार्गावरील प्रवाशांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. बोंडगावदेवी-खांबी मार्गाच्या मध्यभागी नाला असून त्यावर सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या माध्यमातून सुमारे ३५ वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. हा पूल कमी उंचीचा बांधण्यात आला. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यातील पाण्याची पातळी वाढून पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार विस्कळीत होते. आता तर पुलाच्या खालच्या भागातील लोखंडी सळाखी दिसू लागल्याने पुलाची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून बस वाहतूक बंद केली आहे.

blank