मेळघाटातील डाॅक्टरांची रिक्त पदे भरा, नागपुरात घेतला जिल्ह्यातील समस्यांचा आढावा

0
7

नागपूर दि.9- गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेळघाटातील बालमृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मागील सात महिन्यांच्या कालावधीत ३१७ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नागपुरात दिले. रिक्त पदे भरण्याचे सर्वाधिकार सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच भुईखेड आणि शिरजगांव येथील डॉक्टरांची पदेही तातडीने आठवडाभरात भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील मंत्रिपरिषदेच्या सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मेळघाटातील आरोग्याच्या प्रश्नांवर गांभिर्याने चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, मेळघाटात कनेक्टीव्हिटीचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा पुरेसा लाभ मिळत नाही. आदिवासी विकास विभागाने आपली पारंपरिक कार्यपद्धती बदलून नाविन्यपूर्ण योजना आखाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ मेळघाटात सर्वदूर कसे पोहोचेल याचे नियोजन करावे. शासनाकडून कोर एरियात(गाभा क्षेत्र) भरपूर निधी उपलब्ध करुन दिला आहे. विकास प्रकल्प राबविताना आपण गावाचे पुनर्वसन
करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करताना तेथील नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मुलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. त्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.