मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण करणार-बडोले

0
20

खमारी येथे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन
गोंदिया,दि. ११ : रस्ते हे विकासाच्या वाहिन्या आहेत. ग्रामीण दळणवळणात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रामीण भागातील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून बारमाही वाहतूकीच्या सुविधेसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्हयातील सर्वच ग्रामीण रस्त्यांची कामे टप्याटप्याने पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील खमारी येथील बाजार चौकात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खमारी ते चुलोद, आसोली, मुंडीपार रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे,जि.प. कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे, शेखर पटले, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पंचायत समिती सदस्य सारंग भेलावे, ममता वाढवे, इंद्रायणी धावडे, खमारी सरपंच विमल तावडे, चुलोद सरपंच रेखा ठाकुर, छत्रपाल तुरकर, भोलाराम मेश्राम, भाऊराव उके यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खमारी ते चुलोद, आसोली मुंडीपार हा रस्ता १०.६९ कि.मी.चा असून यावर ४ कोटी ८८ लक्ष रुपये खर्च येणार आहे. हे काम लवकर पूर्ण होणार असल्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना येण्या-जाण्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.या योजनेतून गोंदिया तालुक्यासाठी ३९ कि.मी.चे रस्ते मंजूर केले आहे. मागील व यावर्षीचे या योजनेतील कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हयात १०० किमीचे आधुनिक पध्दतीचे रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगून , श्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही रस्त्यांची कामे घेण्यात येतील. यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण जनतेला जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पालकमंत्री हे जिल्हयाचेच असल्यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेमंत पटले म्हणाले, राज्य शासन गावाच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. येत्या ५ वर्षात जिल्हयातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येतील. या योजनेच्या कामामुळे संबंधित गावातील नागरिकांना बाहेरगावी येण्या-जाण्याची चांगली सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता जी.जी.नंदनवार यांनी केले. उपस्थितांचे आभार परमानंद ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला खमारी, चुलोद, आसोली व मुंडीपार येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.