सावित्रीबार्इंचे कार्य नवीन पिढीसाठी प्रेरणादायी

0
10

नागपूर,दि.04 : ज्योतिरावांच्या कार्यात सावित्रीबार्इंना केवळ एक शिक्षिका म्हणून गृहीत धरले जाते. मात्र त्या साध्या शिक्षिका नव्हत्या तर शिक्षणतज्ज्ञ होत्या. या दाम्पत्याने स्वत:च्या कृतीतून मांडलेले शैक्षणिक कार्य आजही सरकारला धोरणात राबवावे लागते. हे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्योतिराव फुले अध्यासन मंडळाचे संचालक व ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरि नरके यांनी व्यक्त केले.

बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, धनवटे नॅशनल कॉलेज व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. हरि नरके यांनी आपले विचार व्यक्त केले. सावित्रीआईने ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून, कधी नेतृत्व करून तर कधी त्यांची अनुयायी म्हणून जातीपातींच्य पलिक डे शैक्षणिक व सामाजिक कार्य केले. एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे. देशात ज्ञान आणि कौशल्याची संकल्पना सावित्रीबार्इंनी सर्वात आधी मांडली. उद्योग शिक्षण शाळेशी जोडण्यासाठी त्या आग्रही होत्या. यासोबतच शेतीच्या शिक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. सर्व जाती, धर्मांच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचे त्यांचे धोरण होते. सावित्री व ज्योतिरावांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेत शिक्षणात, सत्तेत, प्रशासनात व निर्णयप्रक्रियेत महिलांना प्राधान्य देण्याचे धोरण सर्वात आधी राबविले. या गोष्टी डॉ. आंबेडकरांनी संविधानात अंतर्भूतही केल्या. महिलांच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून आहे या त्यांच्याच स्त्रीकेंद्री धोरणाचा २०१२ साली युनोने स्वीकार केला आहे.

फुले दाम्पत्याने त्या काळात विद्यार्थ्यांच्या गळतीची कारणे शोधली, त्यावर उपाय सुचविले आणि गरीब मुलांना शिक्षण देताना ते राबविलेही आहेत. गरिबी, जातीपातीची उतरंड, अभ्यासक्रम अशा प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी केला आणि तसे धोरण राबविले. बालविवाह, सतीप्रथा या अमानवीय परंपराविरोधात लढा उभारला. केशवापन विरोधात न्हाव्यांचा संप केला. परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी स्त्री-पुरुष समानता, ज्ञान आणि कौशल्याची निर्मिती व त्यांचा समन्वय, जातीनिर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह, संसाधनांचे फेरवाटप, संवाद चिकित्सा व विद्रोह ही पंचसुत्री दिली आहे. हे कार्य दस्तावेजाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. प्लेगची साथ आली तेव्हा लोकांची सेवा करतानाच या माऊलीचे निधन झाले. सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याला जगात तोड नाही, अशी भावना प्रा. नरके यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी कार्यक्रमात खासदार अजय संचेती, धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, माजी खासदार खुशाल बोपचे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, बुलडाणा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद खरसने, सचिव वामन शास्त्री, सुषमा भड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या संध्याताई सराटकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबत नवनियुक्त आमदार परिणय फुके व डॉ. बबनराव तायवाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले.