नक्षल्यांच्या कसनसूर दलमची उपकमांडर ज्योती गावडे चकमकीत ठार

0
15

गडचिरोली,दि.५: जहाल नक्षली व कसनसूर दलमची उपकमांडर ज्योती गावडे ही गुरुवारला दुपारी गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-वडगाव जंगलात झालेल्या चकमकीत ठार झाली. अलिकडच्या काळातील पोलिसांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
विशेष अभियान पथकाचे जवाना कोरची-धानोरा तालुक्यातील सीमेवरील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-वडगाव जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनेनंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा मृत नक्षलीची ओळख पटविण्यात आली. मृत नक्षली ज्योती गावडे असल्यावर शिक्कामोर्तब झाले. ज्योती गावडे ही सुरजागड एलओएसची कमांडर होती. तसेच ती कसनसूर दलमची उपकमांडर म्हणून सध्या कार्यरत होती.
या घटनेपूर्वी बुधवारी(दि.४) गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत निहायकल जंगलातही पोलिस-नक्षली चकमक उडाली होती. त्यात पोलिसांनी एक बारा बोर रायफल जप्त केली होती. त्यामुळे त्या भागात नक्षल्यांचा वावर असल्याने पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली होती. या मोहिमेदरम्यान ज्योती गावडेला ठार करण्यात पोलिसांना यश आले.
चालू आठवड्यात नक्षल्यांनी चार जणांची हत्या केली होती. नक्षल कारवाया वाढताच पोलिसांनी अतिशय शांत डोक्याने अभियान राबवून जहाल नक्षली ज्योती गावडे हिला यमसदनी पाठविले.
कोण होती ज्योती गावडे?
मूळची कोरची तालुक्यातील बोटेझरी येथील रहिवासी असलेली ज्योती उर्फ सगोबाई नरसिंग गावडे ही अनेक वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत आहे. टिप्पागड दलमचा कमांडर दिवाकर याची ती पत्नी होती. दिवाकर हा टिप्पागड दलमचा कमांडर आणि उत्तर गडचिरोली डिव्हीजनल कमिटीचा सदस्य होता. परंतु २०११ च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला नक्षल चळवळीतील काही वरिष्ठांनी दिवाकरच्या कार्यप्रणालीवर अविश्वास दाखवून त्याची हत्या केली, अशी चर्चा होती. त्याच्या हत्येनंतर ज्योती गावडे ही महिने वर्षे अस्वस्थ आणि शांत होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत ती पुन्हा सक्रिय झाली होती.