पोलीस पाटील गावचा जिल्हाधिकारी-अभिमन्यू काळे

0
11

गोंदिया दि. 8 : पोलीस पाटील हे पद गावपातळीवर प्रशासनाचे डोळे व हात आहे. प्रत्येक गावात शासन पोलीस तैनात करु शकत नाही. त्यामुळे गावपातळीवरील माहितीचे खरे स्त्रोत पोलीस पाटीलच आहेत. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्याच बरोबर गुन्हे घडणार नाही याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी गावचा जिल्हाधिकारी आहे, असे समजून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यातील 750 पोलीस पाटीलांसाठी प्रेरणा सभागृह कारंजा (गोंदिया) येथे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर उपस्थित होते.

यावेळी कार्यपालन अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी म्हणाले, शासनाचा विविध योजना राबवितांना गावपातळीवर पोलीस पाटलांचे सहकार्य घेणे अपेक्षीत आहे. प्रत्यक्ष योजना राबविणे जरी आपले काम नसले तरी पण आपले गाव, स्वच्छ सुंदर व निरोगी ठेवण्याची जबाबदारी पोलीस पाटलांनी स्वीकारावी असे आवाहन केले. पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ म्हणाले दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. त्या बदलाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस पाटलांना प्रशिक्षीत करणे आवश्यक आहे.

गावातील भिस्त आपणावर अवलंबून आहे. त्यामुळे लक्ष ठेवून गावातील माहिती पोलीस प्रशासनाला त्वरीत पाठवावी. आपले पद शासकीय असल्याने निष्पक्षपणे काम करावे प्रशासन आपले पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली. दुसऱ्या सत्रामध्ये निवासी जिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी प्रशिक्षण दिले.

तिसऱ्या सत्रामध्ये दिलीप भुजबळ यांनी पोलीस स्टेशन निहाय आढावा घेऊन समस्यांचे शंका निरसन केले. प्रास्ताविक दिलीप भुजबळ, संचालन मंजूश्री देशपांडे तर आभार भृंगराज परशुरामकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी सोमाजी शेंडे, दिलीप मेश्राम, आनंद तुरकर, मोहनींसह बघेल, मनोहर चव्हाण, हेमराज सोनवाने, देवेंद्र भांडारकर, डी.जे.पटले, राजेश बंसोड, प्रेमलाल टेंभरे यांनी सहकार्य केले.