नागपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीला हिंसक वळण, भाजपा आमदारावर गुन्हा

0
5

नागपूर, दि. 8 – जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांसाठी आज मतदान होत असून यापैकी काटोलमध्ये किरकोळ वादाची स्थिती दुपारी १२ वाजताच्या सुमारास उद्भवली. दोन विरोधी गट एकमेकांसमोर ठाकल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. दरम्यान, पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिका-यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटाला शांत केले असून भाजपा आमदार आशिष देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या काटोलमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

काटोल नगरपरिषद निवडणूक रिंगणात भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही उडी मारली आहे. त्यातच भाजपपासून दुरावलेला चरणसिंग ठाकूर गट हा विदर्भ माझा पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे काटोलमधील निवडणूक रंगतदार झाली आहे.

अशात आज मतदानाच्या दिवशी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रभाग क्र. २ मधील हेटी परिसरात विदर्भ माझा पक्षाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर हे आपल्या समर्थकांसह आपल्या चारचाकी वाहनाने फिरत होते. त्यातच ते एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात काटोलचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख हे दुचाकीने तेथे आले. चरणसिंग ठाकूर यांची गाडी रस्त्यावर उभी असल्याने त्यांनी गाडी कुणाची आहे, पैसे वाटत आहे का, असे म्हणत त्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. त्यामुळे गाडीचा मागचा काच फुटला. परिणामी चरणसिंग ठाकूर आणि आ. देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. ही बाब ठाकूर यांचे कंत्राटदार बंधू राजू ठाकूर यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तेसुद्धा हमरीतुमरीवर आले. त्यासोबतच नगर परिषदेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी सत्ता असलेले शेकापचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख हेसुद्धा तेथे पोहोचले. त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत होते.