न.प.सार्वत्रिक निवडणूकीत गोंदिया- ६२.७२ %, तिरोडा- ७३.१४ % मतदान

0
8

गोंदिया,दि.८ : गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज ८ जानेवारी रोजी शांततेत मतदान पार पडले. दोन्ही नगर पालिका निवडणूकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. निवडणूकी दरम्यान कुठलीही अडचण येणार नाही यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज होती. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता नंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केली.
गोंदिया येथील १४३ मतदान केंद्रावर आणि तिरोडा येथील ५८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. गोंदिया येथील १ लाख १५ हजार ६०७ मतदारांपैकी ७२ हजार ५०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६२.७२ इतकी असून यामध्ये ३६ हजार ५५८ पुरुष आणि ३५ हजार ९४६ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
तिरोडा नगर पालिका क्षेत्रातील ५८ मतदान केंद्रावर देखील शांततेत मतदान पार पडले. या केंद्रावर २० हजार ८५९ मतदारांपैकी १५ हजार २५८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७३.१४ इतकी आहे. यामध्ये ७ हजार ६४२ पुरुष आणि ७ हजार ६१६ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९ जानेवारी रोजी गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन व तिरोडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.