स्वतंत्र विदर्भासाठी बुधवारी चक्का जाम

0
12

नागपूर, दि. 8 : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे येत्या ११ जानेवारी रोजी संपूर्ण विदर्भभर ८० पेक्षा जास्त ठिकाणी चक्का जाम रास्ता-रोको आंदोलन होणार आहे. नागपूर शहरातील आंदोलन हे गणेशपेठ बस स्टँडसमोर सकाळी ११ ते ५ या वेळात रास्ता रोको आंदोलन केले जाईल. विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपूर शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी गिरीपेठ येथील पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले हे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शंभरावर प्रमुख कार्यकारिणी सदस्य आवर्जुन उपस्थित होते. समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले की, आजवर आम्ही शआंततेने आंदोलन केले. परंतु आता शांततेचे आंदोलन पुरे झाले. येत्या ११ जानेवारीला विदर्भभर चक्का जाम केला जाईल. यादिवशी सर्व पक्षाच्या सर्व विदर्भाच्या संघटनांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शहर अध्यक्ष दिलीप नरवडीया यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरविंद देशमुख, अरुण केदार, प्रभाकर कोहळे, मुन्ना महाजन, भरत बाविसटाले,वसंतराव कांबळे, नागदबडी हिरवकर, भैरुयालाल माकडे, भगवानदास राठी, राजू रहाटे, बाबुराव गेडाम, बंडू पाटील कुहीटे, बाबा राठोड, मंगेश मेश्राम, रंगराव हजारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.