मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा

0
8

भंडारा दि. 12 :: महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यातून मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. या शाळेला शासनाने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी अखिल भारती माळी महासंघाने केली आहे.

सन १ जानेवारी १९४८ रोजी फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली होती. अंधारात खितपत पडलेल्या समाजाला शिक्षीत करुन देशाचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी यांनी प्रयत्न केले. ‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी, ती देशाचा विकास करी’ या तत्वाप्रमाणे शिक्षणाला महत्व आहे. स्त्रि शिकली तर प्रत्येक माणूस घडेल आणि माणूस घडलातर देश विकसित होईल हे तत्व १६७ वर्षापुर्वी फुले दाम्पत्यांनी देशाला दिले. भिडेवाड्यातील शाळेची सुरुवात फुले दाम्पत्यांनी सुरु करुन महिलांना शिक्षणाचा प्रवाहात आणले.

मात्र देशातील पहिल्या शाळेची सध्या दैनावस्था आहे. भिंती खचलेल्या असून पिल्लर गंजलेले आहेत. या इमारतीचा परिसर बकाल झाला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. अशा शहरात ही वास्तु उभी असल्याने राज्य शासनाने या ऐतिहासिक वास्तुची जपणूक करावी या दृष्टीने या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या वेळी शिष्टमंडळात अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश अटाळकर, शंकर राऊत, अंकोश बनकर, अ‍ॅड. रविभूषण भुसारी, अंबादास मंदूरकर, योगेस शेंडे, नितेश किरणापुरे, माधुरी देशकर आदी उपस्थित होते.