रोखरहित व्यवहारावर कार्यशाळा

0
7

गोरेगाव, दि.१६- स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जगत महाविद्यालय गोरेगाव व तहसील कार्यालय गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोखरहित व्यवहारावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.वाय.लंजे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम, गोरेगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार एस.बी.माळी, सहाय्यक निबंधक एन.ए.कदम, जिल्हा संचालक तरूण मनूजा, मनिषा डोडानी, सांस्कृतिक प्रमुख डॉ.आर.एन.साखरे, डॉ.सी.एस.राणे उपस्थित होते.यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एच. भैरम यांनी रोखरहित व्यवहार व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.गोरेगावचे नायब तहसीलदार एस.बी.माळी यांनी आपल्या मार्गदर्शनातून रोखरहित व्यवहार हे राष्ट्रहितास फायदेशीर आहे व जीवनात यशस्वी व्हायचे, असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारीक ज्ञान संपादन करायला पाहिजे, असे मौलिक विचार व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक तरुण मनूजा यांनी प्रोजेक्टरद्वारे कॅशलेस व्यवहार कसा करावा? याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे यांनी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श बाळगून खूप अभ्यास करून जीवनरुपी परीक्षेत प्राविण्य प्राप्त करून महाविद्यालयाचे नावलौकिक करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक डॉ.सी.एस.राणे, संचालन प्रा. लोकेश कटरे व आभार सांस्कृतिक प्रमुख डॉ.आर.एन.साखरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.