महासमाधान शिबीर सडक/अर्जुनीत १८,३८४ लाभार्थ्यांना लाभ

0
10

सडक/अर्जुनी,दि.२3 : शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. या शिबिरातून शासन आपल्या दारी आले आहे. गरजु व पात्र लाभार्थी हा योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी महासमाधान शिबिरे ही लोकचळवळ झाली पाहिजे. असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात २२ फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित महावितरण महासमाधान आणि दिव्यांग स्वावलंबन अभियानाच्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, पं.स.सभापती कविता रंगारी, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, सडक/अर्जुनी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स.उपसभापती विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, श्रीमती मडावी, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.अविनाश काशीवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाभळे यांची उपस्थिती होती.यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे शिबिराच्या माध्यमातून १८,३८४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. गावातील कुटुंबांना जास्तीत जास्त गॅस कनेक्शनचे वितरण वन विभागाने करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग स्वावलंबन अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप, राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना थेट कर्ज योजनेचे २० हजार रुपयाचे धनादेश, वैयक्तीक थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूरीपत्र देण्यात आले. महात्मा फुले महामंडळाअंतर्गत लाभार्थ्याला १० हजार रुपये धनादेश, इतर मागासवर्ग महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेश. वसंतराव नाईक महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना २५ हजार रुपये धनादेश. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नविन शिधापत्रिका, दुय्यम प्रत, जात प्रमाणपत्र, वर्ग-२ चे वर्ग-१ प्रकरण, वाटणीपत्र, वनहक्क पट्टे वाटप, भूमी अभिलेख मोजणी क प्रत वाटप, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, ट्रॅक्टर अनुदान, नॅपसॅक हायटेक स्प्रेपंप, म्हैस खरेदी धनादेश वाटप, शेळी संच धनादेश वाटप, रमाई आवास योजनेअंतर्गत सौर कंदील व ब्लँकेट वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पिव्हीसी पाईप वाटप, मुद्रा बँक लोन, पीओएस मशीन वाटप, सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत पासबुक वाटप, वनविभागामार्फत एलपीजी गॅसचे वितरण, महावितरणकडून घरगुती वीज कनेक्शन, कृषिपंप कनेक्शन, सौर ऊर्जा कृषिपंप आदी योजनेच्या १८ हजार ३८४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
यावेळी महासमाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवोदय विद्यालय नवेगावबांध व आश्रमशाळेच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर करुन उपस्थितांकडून प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाला सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. संचालन अनिल मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार प्रभार गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांनी मानले.