जिल्हा परिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत

0
10

चंद्रपूर दि. २४ -: उमेदवार व मतदारांना गेल्या आठ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरूवारी संपली. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ जागा भाजपाने जिंकून निर्विवाद स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ २० जागा जिंकता आल्या तर ३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचा पुरता सफाया झाला आहे. दोन्ही पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषदेतील नेतृत्व आता बाद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समित्यांमध्येही सफाया झाला असून जिल्हाभरातून केवळ दुर्गापूर १ या पंचायत समिती क्षेत्रातून पंकज ढेंगारे हे एकटेच निवडून आले. तर १५ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांवर भाजपाला स्पष्ट बहुमत असून काँग्रेसला ४ पंचायत समित्यांवर बहुमत मिळाले आहे. सावली व जिवती या पंचायत समितीवर कॉंग्रेस व भाजपाचे सारखे सदस्य निवडून आले असून सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाचे उमेदवार दावा करतात, याकडे लक्ष राहणार आहे.गतवेळी भाजपाला १८ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी भाजपाच्या १५ जागा वाढल्या आहेत. तर काँग्रेसने गतवेळच्या तुलनेत एक जागा गमाविली असून यावर्षी केवळ २० जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने गतवेळी ७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळेस खातेही उघडता आले नाही. तर शिवसेना, शेतकरी संघटना, बसपा, मनसेलाही गतवेळच्या तुुलनेत यावर्षी खातेही उघडता आले नाही. त्यामुळे या पक्षांचे जिल्हा परिषदेतील नेतृत्व पुर्णत: बाद झाले आहे.