भीषण अपघातात गडचिरोलीचे दोन चिमुकले ठार, दोन जण गंभीर जखमी

0
8

सिरोंचा,दि. २५ -:रस्त्यावरील खड्ड्यामुळे टायर फुटून भीषण अपघात झाल्याने गडचिरोली येथील दोन चिमुकले बहीण-भाऊ जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास सिरोंचापासून ३ किलोमीटर अंतरावरील राजन्नापल्ली गावाजवळ घडली.
गडचिरोली येथील धनवंत बोबाटे व रमेश मस्के यांचे कुटुंबीय काल एम.एच.३३ ए-४६३३ क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारने महाशिवरात्रीनिमित्त सिरोंचा पलिकडील कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आज ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरुन सोमनूर संगमाकडे जाण्यास निघाले. मात्र राजन्नापल्ली गावाजवळ पोहचताच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे कारचा टायर फुटला आणि कार तिनदा उलटली. यात कार्तिकी धनवंत बोबाटे(४) व संस्कार बोबाटे(६) हे चिमुकले बहीण-भाऊ जागीच ठार झाले, तर पौर्णिमा बोबाटे(३५) व रसिका उर्फ इशा मस्के(१३) गंभीर जखमी झाल्या. तसेच रमेश मोतीराम मस्के व विनोद मस्के(१८) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तेलंगणातील वारंगळ येथे हलविण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक आनंद दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दुधे घटनेचा तपास करीत आहेत.
सध्या सिरोंचा तालुक्यात रेती वाहतुकीचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. प्रशासन अक्षम्य डोळेझाक करीत असल्याने ओव्हरलोड वाहतूक सुरु असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेच आज भीषण अपघात झाल्‍याचे बोलले जात आहे.