पोरड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा संप सातव्या दिवशीही सुरुच

0
6
Exif_JPEG_420

गडचिरोली,दि.२७-मागील १० महिन्यांपासून संस्थेने वेतन न दिल्याने बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यानी पुकारलेला बेमुदत संप आज सातव्या दिवशीही सुरुच होता.यासंदर्भात संपावर असलेले प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की,चंद्रपूर येथील सरदार पटेल मेमोरियल सोसायटीतर्फे २००९ मध्ये बोदली येथे नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी सुरु करण्यात आले. परंतु सुरुवातीची दोन-तीन वर्षे सोडली, तर नंतरच्या काळात येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना नेहमी वेतनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांनी अनेकदा संस्था व्यवस्थापनाकडे मागणी करुनही त्यांनी समस्या सोडवली नाही. अशातच दहा महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. तसेच बँकेच्या चार महिन्यांच्या ओडी संस्था व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या आहेत. अशाप्रकारे एकूण १४ महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही. १८ महिन्यांपासून प्रॉव्हीडंड फंडही जमा करण्यात आलेला नाही. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी ७ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारुन संस्थेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वेतन न दिल्यास १५ दिवसांनंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. परंतु त्यानंतरही संस्थेने डोळेझाक केल्याने कर्मचाऱ्यांनी २२ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. आज संपाचा सातवा दिवस आहे.
पत्रकार परिषदेला टीएनटी असोशिएशनचे सचिव संदीप चौधरी, चंद्रकांत पारखी, अजन्या इरला, गुणवंत ठाकूर, प्रदीप लाड, नीलेश नंदनवार, गौरव बुद्धावार, विनोद धामंगे, लक्ष्मीकांत मोहाडीकर, विशाल आंबडकर, रागिनी पाटील, संगीता कोंडावार, नीता शेंडे, मीना शेंडे उपस्थित होते. संस्थेने तत्काळ समस्या न सोडविल्यास चंद्रपूर येथील सरदार पटेल मेमोरियल सोसायटीच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यानी दिला आहे.