बाम्हणी ग्रामपंचायतच्या मग्रारोहयो कामात भ्रष्टाचाराचा आरोप

0
15

गोरेगाव दि.०१ मार्च: तालुक्यातील बाम्हणी येथे २00७ पासून करण्यात आलेल्या मग्रारोहयोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुवरलाल सेवईवार यांनी घेतलेल्या माहितीच्या आधारावर केला. दरम्यान पं.स. गोरेगाव व जिल्हाधिकारी कार्यालयापयर्ंत चौकशीची मागणी करण्यासाठी तक्रार केली पण चौकशी थातूरमातूर करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आल्याने दोषींवर कारवाई व्हावी म्हणून बाम्हणीचे सामाजिक कार्यकर्ते कुवरलाल सेवईवार तेथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर २७ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
पंचायत समिती गोरेगावच्या अंतर्गत बाम्हणी ग्रामपंचायतमध्ये २00७ पासून २0१६ पयर्ंत शासनाच्या मग्रारोहयोची व इतर योजनांची अनेक कामे झाली. मग्रारोहयोअंतर्गत मजुरांना कामे मिळाली म्हणून कुशल व अकुशल कामे केली जात आहे. गावात झालेल्या कामांची माहिती काढली असता अनेक कामे न करता जे कधीच रोहयोच्या कामावर जात नाही अशा मजुरांची नावे घालून कामे करण्यात आल्याचे दाखवून शासनाला चुना लावण्यात आला असल्याचे उघड झाले. यात ग्रामपंचायत सरपंच, सचिव, रोजगार सेवक, अभियंता, ए.पी.ओ. यांनी मोठा भ्रष्टाचार करून शासनाची लूट केली असून याची चौकशी करण्यासाठी, बीडीओ दिनेश हरिणखेडे व उच्चाधिकारी यांना अनेकदा तक्रारी देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. बाम्हणी गावात मग्रारोहयोच्या अंतर्गत पटांगण सपाटीकरण, भात खाचर, पांदण रस्ते, सिंचन विहीर, गावातील सिमेंट रस्ते बांधकाम, बांबू खरेदी प्रकरण यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुवरलाल सेवईवार यांनी केला आहे. दरम्यान पंचायत विभागाला अनेकदा तक्रार देऊनसुद्धा चौकशी थंडबस्त्यात असल्यामुळे गावकर्‍यांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला असून २७ फेब्रुवारीपासून ते ग्राम पंचायतीसमोर आमरण उपोषणावर बसले आहेत.