भातखाचरची कामे प्रगतीपथावर

0
11

अर्जुनी मोरगाव दि. 4 –: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत (२०१६-१७) बोंडगावदेवीची गावाची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लाभप्रद होतील अशी शेतीपयोगी विविध कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतामधील भातखाचराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतशिवारामध्ये जाऊन भातखाचर कामांची पाहणी केली.जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी नाल्यातील पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्यात आले. नवनिर्मित बंधाऱ्यांनी ओलीताखालील शेतीचे क्षेत्र वाढले. बंधारा परिसरातील शेतीला जलसिंचनाची सोय उपलब्ध होऊन पिक उत्पादनात वाढ झाली.बंधारा बांधकामामुळे ठिकठिकाणी पाणी अडवून पाण्याच्या संचित साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली. मुबलक पाण्याच्या संचयाने शेतकऱ्यांना विविध पिके घेण्याची संधी प्राप्त झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतशिवार हिरव्यागार अलंकारांनी नटल्याचे चित्र दिसत आहे.सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतातील धुऱ्यांवर माती टाकणे, भातखाचर दुरूस्तीचे काम जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात येत आहे. गावातील जवळपास ७० शेतकऱ्यांच्या ५० हेक्टर शेतीमध्ये भातखाचराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
सदर कामांमुळे शेती समतल होऊन पाणी मुरण्यास सहज शक्य होणार आहे. शेतीच्या बांधावर माती टाकून धुरा (पार) बांधले जात आहे. भातखाचर दुरूस्तीच्या कामांनी शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची बचत होऊन नव्याने माती टाकलेल्या धुऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तुर, तिळाचे पिक घेणे सहज शक्य होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरत आहे.
येथील शेतशिवारात सुरू असलेल्या भातखाचर दुरूस्तीच्या कामाची पाहणी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक रुषी चांदेवार, कृषी सहायक मसराम यांनी करून शेतकऱ्यांना मौलीक सल्ला सुध्दा दिला.