ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या

0
12

भंडारा दि.०5: यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्स (मतपत्रिका) द्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हाध्यक्ष दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी यांनी केली आहे.

मागील वर्षात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरून मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकांचे निकाल नागरिक आणि मतदारांतील असंतोष पाहता जे उमेदवार निवडून येण्याची १०१ टक्के खात्री होती ते उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकल्या जाऊन पराभूत झाले. यामुळे निश्चितपणे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बदल करून घोळ करण्यात आला असल्याच्या शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका नि:पक्षपाती व्हाव्यात, या भावनेतून मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करीत असतात पण वरील निवडणुकांचे निकाल मतदार नागरिकांच्या मनात असंतोष पसरविणारे आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच ठिकाणी मोर्चे काढण्यात आलीत व आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याद्वारे ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सुधारणा करणे काळाची गरज आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा त्यांच्यापहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदानाला विरोध दर्शवून बॅलेट पेपर्स द्वारे मतदान घ्यावे अशी सूचना केल्यानंतर अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घेण्यात आले होते. याप्रकरणी केंद्र व राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाने मतदार नागरिकांच्या भावनांचा आदर करून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घ्यावे अशी मागणी बी.आर.एस.पी. चे नेते संजय गाढवे, झेड.आर. दुधकुवर, मनोज गोस्वामी यांनी केली आहे.