रत्नापूर येथील बचत गटाला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार

0
15

सिंदेवाही दि.०5: ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय सरस महोत्सव स्वयंसिद्धा-२०१७ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील यशस्वी महिला बचत गटाला प्रथम पुरस्कार नुकताच देण्यात आला.
राजमाता जिजाऊ स्वावलंबन तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, आ. बाळू धानोरकर, जि.प. अध्यक्षा संध्या गुरूनुले, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन या बचत गटाला गौरविण्यात आले.या बचत गटाने मागील तीन-चार वर्षांपासून ‘पत्रावळी गृहउद्योग’ सुरू केला असून त्यांनी गटाच्या नावाप्रमाणे यशस्वीपणे चालवित आहेत. हा नाविण्यपूर्ण व्यवसाय करून तालुक्यात आदर्श बचत गट म्हणून नावारूपास आलेला आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्राप्त देण्यात आला.
या गटाच्या अध्यक्षा शालिनी मेश्राम, सचिव दिक्षा मेश्राम, सुनिता दिलीप मेश्राम, गयाबाई मेश्राम, जोशीला मेश्राम, शांता मेश्राम, पंचशिला मेश्राम, संगीता विनोद मेश्राम, विमल मेश्राम, संगीता रामकृष्ण मेश्राम, देवांगणा मेश्राम, लिला अलोणे या महिलांनी चांदा क्लब ग्राऊंडवर सदर पुरस्कार स्वीकारला. शासनाकडून अशा प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याने बचत गटांना स्फूर्ती मिळते आणि पुन्हा महिला जोमाने कामाला गती देतील, असे मत गटाच्या मार्गदर्शिका सुनिता दिलीप मेश्राम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.