अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचीही नासाडी

0
12

चंद्रपूर दि.9: मंगळवारी चंद्रपूर तालुक्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागातील शेतात गारांचा खच पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हाताशी आलेल्या रबी पिकांना जोरदार फटका बसला. भाजीपाला पीकही उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांची लाखोंची हानी झाली आहे. जिल्हयातील बल्लारपूर, राजुरा व चिमूर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिवीत हानीसुध्दा झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित अर्थसहाय्य देण्याचे निर्देश राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना दिले आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरातील हजारो हेक्टरमधील शेतपिकांची नासाडी झाली. यात गहू, हरभरा मुंग, उडद, मिरची, कापूस व भाजीपाल्यांचा समावेश आहे. शेतीच्या नुकसानीने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. मंगळवारी अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले व विजेच्या कडकडासासह वादळी पाऊस व गारपीट झाली. तब्बल एक तास गारपीट झाल्याने शेतपिक जमीनदोस्त झाले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, पळसगाव, कवडजई, काटवली, बामणी, मानोली, इटोली, आमडी, कळमना, परसोडी, कुडेसावली आदी गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे भयंकर नुकसान झाले. गहू, ज्वारी, तूर, मिरची पीक जमीनीवर लोटून गेले तर उभ्या झाडावरील मिरची तुटून खाली जमा झाली. वादळामुळे अनेक घराचे छपरे उडून गेले, कच्चे मकान व झोपड्या ढासळल्या. अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर गाराचा खच जमा झाला. कोठारीतील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ आंब्याचे झाडे कोसळले. इलेक्ट्रीकच्या तारा तुटल्या. त्यामुळे गावात मंगळवारी रात्रभर अंधाराचे साम्राज्य होते. कोठारीतील श्रीधर मोरे व सुरेश कंदीकटीवार यांच्या शेतातील कुकुटपालनचे शेड पूर्णत: उडाले. त्यात शेकडो कोंबड्या ठार झाल्या.