स्त्री पुरुष समानतेसाठी महिला चळवळ अधिक व्यापक व्हावी -आयुक्त अनुप कुमार

0
14

नागपूर दि.9:- स्त्रियांच्या समाजातील दर्जाला संरक्षण देण्याच्या हेतूने राज्यघटनेमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रियादेखील आपले हक्क आणि अधिकारांबाबत जागृत झाल्या आहेत. परंतु अजूनही समाजात स्त्री-पुरुष समानता हव्या त्या प्रमाणात रुजलेली आढळून येत नाही. महिला दिनासारख्या महत्त्वाच्या दिनाचे औचित्य साधून महिला चळवळ अधिक व्यापक होऊन ती यशस्वी व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
मातृसेवासंघ सभागृह येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला बाल विकास विभाग व राज्य महिला आयोगामार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005’ या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सीमा साखरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त एम. डी. बोरखडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयकुमार परदेशी, मातृसेवा संघाच्या सचिव श्रीमती लता देशमुख आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले की, आजही ग्रामीण भागातील स्त्रियांच्या मेहनतीला पुरुषांच्या समकक्ष मेहनताना मिळत नाही. महिला राबराब राबून देखील त्यांच्या मेहनतीला मोल नाही. परंपरेने काही कामे स्त्रियांनीच करावी, असा जणू समाजात अलिखित नियमच आहे. धान पिकाची रोवणी, पिकांची निंदणी स्त्रियाच करतात. आसामसारख्या राज्यात चहाची पाने खुडण्याचे कार्य परंपरागतपणे स्त्रियाच पार पाडीत आल्या आहेत. म्हणून स्त्रियांची परिस्थिती पालटण्यासाठी समाजाची विचारधारा बदलणे गरजेचे आहे. स्त्रीलाही पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळायला हवे. ‘मुलागा’च पाहिजे ही मानसिकता बदलायला हवी. या मानसिकतेतूनच मीरज-सागंली सारखे भ्रूणहत्याकांड घडून येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या योजनेचे लोण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचायला हवे. स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध ‘भरोसा सेल’ शहरात उत्तम कामगिरी बजावत आहे.
ज्येष्ठ समाजसेविका सीमा साखरे स्त्रियांच्या प्रश्नांबाबत बोलताना म्हणाल्या की, ‘महिला’ ही एक स्वतंत्र व्यक्ती असून ती कोणा पुरुषावर अवलंबून नाही. आपल्या संविधानाने दिलेली ‘स्त्री-पुरुष समानता’ ही महत्त्वपूर्ण बाब आहे. जाचक रुढी परंपरेला छेद देऊन समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे. महिला दिन ही केवळ एक औपचारिकता नाही. समाज बदलाची प्रक्रिया देखील एकाच दिवसात होणार नाही. परंतु बदलाची सुरुवात करणारा दिवस म्हणून महिला दिनाकडे पहायला हवे.यावेळी महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, मातृसेवासंघाच्या सचिव श्रीमती लता देशमुख, महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त एम. डी. बोरखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल जाधव यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला व बाल विकासाच्या परिविक्षा अधिकारी श्रीमती सुजाता देशमुख तर आभार प्रदर्शन शासकीय करुणा वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती भारती मानकर यांनी केले.