गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ५ पंचायत समित्या काँग्रेसकडे

0
11

गडचिरोली, दि.१४: जिल्ह्यात आज झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत १२ पैकी सर्वाधिक ५ पंचायत समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले, तर भाजपला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ व आविस आणि ग्रामसभांना प्रत्येकी एका पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यात यश आले.
जिल्ह्यात १२ पंचायत समित्या आहेत. त्यापैकी गडचिरोली, कोरची, कुरखेडा, आरमोरी व मुलचेरा पंचायत समित्यांवर काँग्रेसने सत्ता मिळविली. देसाईगंज, धानोरा, चामोर्शी या तीन पंचायत समित्यांवर सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. सिरोंचा व एटापल्ली पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवल्या. अहेरी पंचायत समितीवर आदिवासी विद्यार्थी संघाने झेंडा रोवला. भामरागड पंचायत समितीवर ग्रामसभांनी निवडून दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी सत्ता प्रस्थापित केली.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची, कुरखेडा व आरमोरी या तीन पंचायत समित्यांवर काँग्रेसने सत्ता मिळवली, तर केवळ देसाईगंज पंचायत समिती आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आले. कोरची पंचायत समितीत काँग्रेसच्या कचरीबाई काटेंगे ईश्वरचिठ्ठीने सभापती म्हणून निवडून आल्या. काँग्रेसचेच श्री.मातलाम हेही ईश्वरचिठ्ठीनेच उपसभापती झाले. गटबाजीमुळे काँग्रेस सत्ता गमावेल की काय, अशी चर्चा असलेल्या कुरखेडा पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित करण्यात काँग्रेसला यश आले. तेथे काँग्रेसचे गिरीधारी तितराम हे सभापती म्हणून, तर मनोज दुनेदार उपसभापती म्हणून विजयी झाले. आरमोरी पंचायत समितीत काँग्रेसच्या बबीता उसेंडी सभापती म्हणून, तर यशवंत सुरपाम उपसभापती म्हणून विजयी झाले.
देसाईगंज पंचायत समितीवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तेथे सभापतिपदी भाजपचे मोहन गायकवाड, तर उपसभापतिपदी भाजपचेच गोपाल उईके यांची अविरोध निवड करण्यात आली. देसाईगंज पंचायत समितीत सहाही सदस्य भाजपचेच आहेत, हे विशेष.
गडचिरोली पंचायत समितीत काँग्रेसच्या दुर्लभा बांबोळे सभापतिपदी निवडून आल्या, तर रासपच्या तिकिटावर निवडून आलेले विलास केशवराव दशमुखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन उपसभापतिपद बळकावले.
सिरोंचा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता बसविली. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमला बोडका गावडे सभापतिपदी निवडून आल्या, तर रिक्कुला कृष्णमूर्ती उपसभापती झाले.
एटापल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेबी लेकामी सभापती म्हणून विजयी झाल्या, तर आदिवासी विद्यार्थी संघाचे नीतेश नरोटे उपसभापती झाले. भामरागड पंचायत समितीवर ग्रामसभांच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या उमेदवारांनी सत्ता प्रस्थापित केली. सभापती म्हणून सुखराम महागू मडावी, तर उपसभापती म्हणून प्रेमिला झुरु कुडयामी बिनविरोध विजयी झाले.
अहेरी पंचायत समितीवर आदिवासी विद्यार्थी संघाच्या सुरेखा आलाम सभापती म्हणून, तर राकेश तलांडे उपसभापतिपदी विजयी झाले. या पंचायत समितीवर १२ पैकी आविसचे ८ सदस्य आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या गावातच भाजपला पंचायत समितीची सत्ता प्रस्थापित करता आली नाही.
चामोर्शी पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे आनंद भांडेकर, तर उपसभापती म्हणून अंकुली बिस्वास विजयी झाले.
धानोरा पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे अजमन राऊत, तर उपसभापतिपदी अनुसया कोरेटी निवडून आल्या. ५५ वर्षांनतर प्रथमच धानोऱ्यात भाजपची सत्ता आली, हे विशेष.
मुलचेरा पंचायत समितीत काँग्रेसच्या सुवर्णा येमुलवार सभापती म्हणून, तर भाजपचे बासू मुजुमदार उपसभापतिपदी निवडून आले.