गोसीखुर्द प्रकल्पाला गती देण्यासाठी ‘एनबीसीसी’बरोबर सामंजस्य करार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
6

मुंबई दि. 16 – : गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असून, याद्वारे पहिल्या टप्प्यात 1 हजार 70 कोटी रूपयांची कामे कंपनीकडून केली जातील. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
राज्य शासनाचा जलसंपदा विभाग व केंद्र शासनाची नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ही कंपनी यांच्यात गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाबाबतचा सामंजस्य करार आज झाला. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, प्रकल्प समन्वयक (गोसी खुर्द) व्ही.एस.कुलकर्णी, कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. अनुपकुमार मित्तल, योगेश शर्मा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे आदी उपस्थित होते.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामास गती देण्याच्या दृष्टीने ‘एनबीसीसी’कडे प्रकल्पातील काही घटकांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 1 हजार 70 कोटी रूपये किंमतीची कामे कंपनीस सोपविण्यात येत असून, त्यामुळे प्रकल्पाच्या कामाचे नियंत्रण व अंमलबजावणी होऊ शकेल. जलसंपदा विभागाकडील प्रकल्पांबाबत अशा प्रकारे प्रथमत:च बाह्य संस्थेमार्फत काम (Outsource) करण्यात येत आहे. ही संस्था प्रकल्प सल्लागार व अंमलबजावणी अशी दोन्ही कामे करेल.