गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा

0
16

गडचिरोली दि.६: अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे विदर्भात गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नाही. प्रत्यक्षात गोवारी हीच जात महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा व मध्यप्रदेशात आहे. गोवारी समाजाची संस्कृती आदिवासी संस्कृतीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.यावेळी बाजीराम नैताम, दामोधर नेवारे, मोहन सरपे, गजानन कोहळे, हिरासिंग कोराम, हेमंत शेंद्रे, डुकालू वाघाडे, रमेश चामलाटे, धनराज दुधकुवर, श्रावण भोंडे, श्यामराव वाघाडे उपस्थित होते.
इंग्रजकालीन मेजर ल्युशी स्मिथ सेटलमेंट रिपोर्ट, १९११, १९२१, १९३१ ची जनगणना, १९४१ चा सीपी अ‍ॅण्ड बेरार महसूल विभागाचा आदेश, १९४१ चा सीपी अ‍ॅण्ड बेरार शिक्षण विभागाचा आदेश, १९५० मधील बॅकवर्ड क्लास कमिशन रिपोर्ट दुरूस्ती, १९७९ चे महाराष्ट्र शासनाचे गोपनीय पत्र यामध्ये गोवारी जमातीचा उल्लेख आढळून येतो. १९५३ साली काका कालेलकर आयोग गठीत करण्यात आला. या आयोगाने गोवारी अशीच शिफारस केली होती. मात्र अनुसूचित जमातीच्या यादीत १९५६ रोजी चुकीने गोंडगोवारी अशी संयुक्त नोंद झाली. ती नोंद आजही कायम आहे. १९५६ ला गोंडगोवारी अशी नोंद आल्यानंतर गोवारी जमातीच्या लोकांनी गोंड-गोवारी अशी जात प्रमाणपत्र घेऊन सोयीसुविधा १९८५ पर्यंत घेतल्या. मात्र महाराष्ट्र शासनाने २४ एप्रिल १९८५ मध्ये जीआर काढून दोन गोवारीमध्ये फरक दाखविला. गोवारी व गोंडगोवारी हे वेगळे असल्याचे दाखविण्यात आले. त्यानुसारच १९९४ चा नागपूर येथे हत्याकांडही झाला होता. या हत्याकांडात सुमारे ११४ गोवारी बांधव शहीद झाले. मात्र शासनाने अजूनही दुरूस्ती केली नाही. समाजशास्त्राच्या सिद्धांतानुसार दर २० महिलांवर बोलीभाषा, चालीरिती, रूढी, परंपरा बदलतात. आजपर्यंतच्या कोणत्याही जुन्या दस्तावेजात गोंडगोवारी अशी जात आढळली नाही. गोवारींनाच गोंडगोवारी बोलण्याचा प्रघात आहे. मात्र ती फक्त गोवारी जमातच आहे. चुकीची दुरूस्ती शासनाने करून अनुसूचित जमातीत समावेश करावा, अन्यथा राज्यभरात आणखी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक क्रिष्णा सर्पा यांनी केली आहे.