वाघाच्या हल्ल्यात मोहफुले वेचणारा इसम ठार

0
12

देसाईगंज दि.६- : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा रवी जंगल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून,सकाळी कक्ष क्रमांक ८०८ मधील जंगलात मोहफुले वेचण्यास गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करुन त्यास ठार केले. लवाजी कुकसू मेश्राम(५५)रा.कोंढाळा असे मृत इसमाचे नाव आहे.
सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम असल्याने लवाजी मेश्राम हे सकाळी जंगलात गेले होते. मोहफुले वेचत असताना झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते ठार झाले. दुपार होऊनही लवाजी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. यावेळी शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत लवाजीचा मृतदेह एका झुडपात आढळला. घटनेची माहिती मिळताच वडसाचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार, क्षेत्रसहायक किशोर माडावार, कोंढाळ्याचे वनरक्षक मुखरु किनेकर, रविचे वनरक्षक नितीन गडपायले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.