पोलिसांनी निकामी केली नक्षल्यांनी पेरुन ठेवलेली ३ किलो स्फोटके

0
8

गडचिरोली,दि. 7: मोठा घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील मौसम गावानजीकच्या पुलाखाली पेरुन ठेवलेली स्फोटके केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी निकामी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
नक्षलग्रस्त भागात पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असतात. त्यांचा घातपात करण्याच्या हेतूने आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील मौसम गावाजवळच्या नाल्याच्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटके पेरुन ठेवली होती.केंद्रीय राखीव दलाच्या ९ बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना स्फोटके पेरुन ठेवल्याचे लक्षात आले. लागलीच ही माहिती अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक राजा सामी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांना देण्यात आली. काही क्षणातच बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण करण्यात आले. त्यांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती निकामी केली. एका स्टीलच्या डब्यात ३ किलो स्फोटके आढळली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी नक्षलवाद्यांविरुद्ध राजाराम खांदला उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.