कृषी गोदामसाठी ३५ कोटी द्या-जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर

0
43

गडचिरोली,दि.10: जिल्ह्यात साठवणुकीची अपुरी व्यवस्था असल्यामुळे शेतकर्‍यांची दरवर्षीच तारांबळ उडते. यासोबतच रासायनिक खताची साठवण करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे रॅकपाईंट लागेपर्यंत शेतकर्‍यांना खताचीही प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जिल्ह्यात कृषी उत्पादन व रासायनिक खताची साठवणूक वाढविण्यासाठी कृषी गोदाम उभारणे गरजेचे आहे. यासाठी ३५ कोटी रुपये देण्यात यावे, या निधीतून जिल्ह्यात १00 गोदाम उभारण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मागणी केली आहे.
जिल्ह्याच्या दुर्गम भागात शेतीसाठी आवश्यक साहित्य साठविण्याची गरज आहे. पावसाळयात मार्ग बंद पडत असल्यामुळे वेळेवर साहित्य पुरवठा करणे कठीण जाते. त्यामुळे दुर्गम भागातही शासकीय गोदाम असणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ या यंत्रणांकडे शेतमाल साठवणुकीसाठी केवळ १५ गोदाम आहेत. त्यांची साठवणूक क्षमता १९ हजार ७५0 मेट्रीकटन आहे. जिल्ह्याच्या गरजेनुसार ही व्यवस्था तोकडी असल्याचेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनातून जि.प. अध्यक्ष भांडेकर यांनी नमूद केले आहे.