पूर्व विदर्भातील रेल्वे स्थानकांना मध्य रेल्वेशी जोडा-ड्रामाची मागणी

0
13

गोंदिया दि.16 : पूर्व विदर्भात रेल्वेगाड्यांना व स्टेशनला मध्य रेल्वेशी जोडण्याची मागणी डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली. बिलासपूर झोनधील ज्या रेल्वेगाड्या व रेल्वे स्टेशनचा ज्या पद्धतीने विकास करण्यात आला आहे त्या पद्धतीने पूर्व विदर्भातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात आला नाही. जवळपास २0 रेल्वेगाड्या झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून दुर्ग रेल्वे स्टेशनवर समाप्त होतात. मात्र, त्या रेल्वेगाड्यांचे महाराष्ट्रापर्यंत विस्तारीकरण करण्यात आले नाही. तिसरी रेल्वेलाईन फक्त छत्तीसगडमध्ये टाकण्यात आली. परंतु गोंदिया-भंडारा-इतवारी मार्गावर अद्यापही तिसर्‍या लाईनचे काम सुरू झालेले नाही. प्रशासकीय दृष्टिकोनातून आमदार व खासदारांना बिलासपूरला जाणे उलटे पडते. त्यामुळे मुंबई मुख्यालयापासून महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांची रेल्वेलाईन मुंबई मध्य रेल्वेशी जोडण्यात यावी. सोबतच गोंदिया रेल्वेस्थानकावर कोट्यवधी रुपये खर्च करून जे रेल्वे मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याचा काहीच उपयोग नाही. परिणामी रेल्वेचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहेत. तेव्हा याला जबाबदार रेल्वे अधिकार्‍यांविरोधात उचित कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय यावर सकारात्मक विचारविनिमय करून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.