रिसामा दारु दुकानाच्या विरोधात महिलांचा एल्गार

0
10

महेश मेश्राम,आमगाव,दि.16 : तालुक्यातील रिसामा येथे सुरू असलेल्या देशी दारू दुकानाला शासनाने तत्काळ बंद करून येथील भंग पावलेली शांतता पूर्ववत करावी, या मागणीचे निवेदन रिसामा येथील महिलांसह गावकर्‍यांनी आमगावचे पोलीस निरीक्षक भस्मे यांना निवेदन दिले. सोबतच दारू दुकान तत्काळ बंद करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, आबकारी विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदारांना दिले आहे. निवेदर सादर करताना पं.स.सदस्य छबुताई उके, सरपंच निर्मला रामटेके, उपसरपंच तिरथ येटरे, महेश उके, रामेश्‍वर श्यामकुवर, अरुणा बहेकार, कल्पना बावनथडे, रमाताई चव्हाण, नीता शहारे, सुमन पेंदोर, तृप्ती बहेकार, हेमलता पागोटे, अंजना येटरे, दुर्गाबाई येटरे, निर्मला येटरे, पारबता डोमळे, विद्या उके, प्रभा तुमसरे, ज्योती खोटेले, आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय व राज्य मार्गापासून ५00 मीटर अंतरावरील मद्यविक्रीची दुकाने बंद होणार असल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला होता. परंतु नंतर ५00 मीटरची र्मयादा शिथिल करून अंतर कमी करण्यात आले. त्यामुळे आमगाव तालुक्यातील बार व देशी दारू दुकाने बंद झाली असली तरी रिसामा येथील देशी दारू दुकानाचे अंतर मुख्य मार्गापासून जास्त असल्याने हे दुकान सुरूच आहे. इतर दुकाने बंद झाल्याने या दुकानासमोर मद्यपींची संख्या कमालीने वाढली आहे. मद्यपींच्या वाढत्या गर्दीमुळे असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होत आहे. त्यांच्या वागणुकीमुळे परिसरातील महिला व मुलींना अपमानास्पद वर्तणुकीला सहन करावे लागत आहे. मद्यपींच्या विचित्र हालचाली आणि असामाजिक तत्त्वांचे वाढते प्रमाण यामुळे येथील शांतता, सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कोणत्याही वेळी अनैतिक घटना घडू शकते. यापूर्वी याच दारू दुकानासमोर सख्ख्या भावानेच आपल्या भावाचा खून केला होता. या घटनेची प्रशासनाला जाणीव आहे. चुकीचे नियम आणि अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने येथील देशी दारू दुकान सुरू असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील. असे गावकर्‍यांनी निवेदनातून ठणकावले आहे.