महाराष्ट्र दिनी सुटणार महाराष्ट्र एक्सप्रेस प्लेटफार्म 1 वरुन

0
9

गोंदिया,दि.16 : येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवरून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस १ मे पासून फलाट क्रमांक एकवरून सुटणार आहे, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी शनिवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

व्यापारनगरी म्हणून गोंदियाची ओळख आहे. मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर, बाहेर जिल्ह्यातील नागरिक गोंदियात येत असतात. कामानिमित्त येणार्‍या-जाणार्‍या लोकांचीदेखील अधिक वर्दळ असते. यातील बहुतांश प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. गोंदिया ते कोल्हापूर धावणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस ही फलाट क्रमांक पाचवरून सुटते. त्यामुळे ऐन घाईगडबडीत ही रेल्वे पकडताना अनेक प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. प्रसंगी रेल्वे सुटूनही जाते. याचा मानसिक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. या सगळ्या बाबी तपासून १ मे महाराष्ट्रदिनी महाराष्ट्र एक्स्प्रेस फलाट क्रमांक एक वरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. फलाट क्रमांक एकवरूनच लिफ्ट सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच १ मे रोजी रेल्वेस्थानक परिसरात अपंग बांधवांकरिता रेल्वे प्रवास सवलतीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. याकरिता शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबिर एका दिवसाचे असले तरी, कोणाला प्रमाणपत्र न मिळाल्यास शिबिराचा कालावधी वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.