राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तीन पदाधिकाऱ्यांविरुध्द जिल्हाधिकार्याकडे तक्रार

0
7

देवरी,दि.17 : येथील नगर पंचायतीच्या १३ फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेत न आलेल्या विषयांची नियमबाह्यपणे नोंद प्रोसेडिंगमध्ये घेतल्याने नगर पंचायतच्या १६ नगरसेवकांनी ३ पदाधिकाऱ्यांविरूध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि.१२) तक्रार केली. आता जिल्हाधिकारी या तीन पदाधिकाऱ्यांना अपात्र करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्या नगरपंचायतचे राजकारण पालटण्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता येथे असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेश जैन यांचाही तक्रारकर्तेमध्ये भाजप नगरसेवकासोबत समावेश असल्याने विविध राजकीय चंर्चांना उधाण आले आहे.

सविस्तर असे की, नगर पंचायतची सर्वसाधारण सभा ५ एप्रिल रोजी सिरपूर येथील विश्रामगृहात घेण्यात आली होती. या सभेच्या एक दिवसाअगोदर म्हणजे ४ एप्रिल रोजी मागील सर्व साधारण सभेचे १३ फेब्रुवारीचे कार्यवृत्त नगरसेवकांना देण्यात आले होते. वेळेवर मिळालेल्या कार्यवृत्ताचे वाचन केल्यावर नगरसेवकांच्या निदर्शनास आले की सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर कोणतेच विषय आलेले नव्हते. सभेच्या विषय सुचीमध्ये क्र.१ ते १६ पर्यंत विषय होते. फक्त त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते.

चर्चेत न आलेल्या विषयांची नियमबाह्य नोंद सभेच्या प्रोसेडींगमध्ये घेवून व नगरसेवकांना अंधारात देवून प्रस्ताव क्रं.१७ ते १९ मंजूर झाल्याचे दर्शविले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व गैरकायदेशीर असून नियमबाह्य नोंद करणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र १६ नगरसेवकांनी १२ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. १९ सदस्य संख्या असणाऱ्या देवरी नगर पंचायतच्या १६ नगरसेवकांनी ३ मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाहीची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली असून हे तीन नगरसेवक स्वत:ला वाचविण्याकरीता धडपड करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, नियमबाह्य घेण्यात आलेले ठराव क्रं.१७ ते १९ यामध्ये सूचक अनुमोदक व ठराव पारीत करणाऱ्या अध्यक्षांवर नगर पंचायत अधिनियम ५५ अ अंतर्गत अपात्रतेची कारवाही निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके व बांधकाम सभापती आफताब शेख यांचेवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य नेमीचंद आंबीलकर, रितेश अग्रवाल, दवीदरकौर भाटीया, माया निर्वाण, हेमलता कुंभरे, महेश जैन, संतोष तिवारी, कौसल्या कुंभरे, संजय उईके, कांता भेलावे, भुमिता बागडे, कोकीळा दखने, यादव पंचमवार, प्रवीण दहीकर, अनिल अग्रवाल व सीता रंगारी यांनी लेखी तक्रार केली असून लवकरच या तीन पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

उल्लेखनीय असे की, १८ महिन्यांचा कार्यकाळ या नगरसेवकांचा झाला असून आता जर या तीन सदस्यांवर अपात्रतेची पाळी आली तर या तिन्ही जागांवर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही