सेवा पध्दतीत सुधारणा करुन योग्य समन्वयातून काम करणार- रविंद्र ठाकरे

0
12

गोंदिया,दि.६ : जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून काम करते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवा पध्दतीत सुधारणा करुन पदाधिकारी व अधिकारी यांच्या योग्य समन्वयातून काम करणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे ठाकरे यांनी ४ मे रोजी स्विकारली यावेळी ते भेटीदरम्यान बोलत होते.श्री.ठाकरे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान, माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरण करणे, दोन हजार विहिरी संरक्षित सिंचनासाठी तयार करणे, शेतीपुरक व्यवसाय म्हणून मत्स्य शेतीला चालना देणे, कुपोषणावर मात करणे, शुन्य माता व बाल मृत्यू अभियान प्रभावीपणे राबविण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सेवा पध्दतीत सुधारणा करण्यासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून त्यांचे मनोबल वाढविणार असल्याचे सांगून श्री.ठाकरे म्हणाले, त्यांना सक्षम करणे व प्रेरणा देण्याचे काम करण्यात येईल. जिल्ह्यात लोकसहभाग चांगला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा लोकांच्या सहभागातून डिजीटल झाल्या आहे हे यावरुन दिसून येते. असे त्यांनी सांगितले.
श्री.ठाकरे यांची पहिली नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेतून उपजिल्हाधिकारी या पदावर १९९४ मध्ये भंडारा येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. जवळपास तेथे दीड वर्ष काम केले. यादरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या भंडाऱ्यातील कुटुंबांना मदत, मतदार नोंदणी मोहिमेत प्रभावी काम केले. त्यानंतर १९९६ मध्ये मौदा येथे आठ महिन्याच्या कालावधीत तहसिलदार व उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. यावेळी मौदयातील ६५० गरजू लाभार्थ्याना भूखंडाचे वाटप केले. जातीच्या प्रमाणपत्रांचे देखील मोठ्या प्रमाणात वितरण केले. गौण खनीजातून शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. १९९६ ते १९९९ दरम्यान वर्धा उपविभागीय अधिकारी म्हणून कामे केले. येथे भाडे नियंत्रण आदेश मोठ्या प्रमाणात काढले. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामासोबतच सेवाग्राम येथे येणाऱ्या महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा राजशिष्टाचार सांभाळला.
सन १९९९ ते २००१ या कालावधीत श्री.ठाकरे यांनी गडचिरोली येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे २००१ ते २००६ या काळात पावणेपाच वर्ष उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. या दरम्यान राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे संघ स्थापन करुन त्यांचा संत्रा दुबईला निर्यात केला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहिर पुनर्भरणाची कामे करण्यात आली. २९ एप्रिल २००६ ते १५ मार्च २००९ या काळात अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. या काळात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधितांना मदत, ५४ गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला, ७७ नदी तलावातील गाळ लोकसभागातून काढण्यात आला. अल्पसंख्यांक युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात आले.
यवतमाळ येथे सन २००९ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून ४ महिने निवडणूक विषयक काम केले. २००९ ते २०११ या कालावधीत अकोला येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असतांना अकोला महानगरपालिक आयुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळला. या दरम्यान डाळीची साठेबाजी करणाऱ्याविरुध्द धडक मोहिम राबवून जवळपास ११ कोटी रुपयांची डाळ जप्त केली. २०११ ते २०१६ या कालावधीत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त म्हणून काम केले. याच दरम्यान २०१२ ते २०१६ कृषि समृध्दी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून ४ वर्ष अतिरिक्त कार्यभार सांभाळला. या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी आत्महत्या प्रवण सहा जिल्ह्यात संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधीच्या इफाळ, राज्य सरकार व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये काम केले. या प्रकल्पात मृद संधारणाचे मोठ्या प्रमाणात काम केले. शेतकऱ्याच्या संत्र्याला ३ हजार रुपये टनावरुन ३० हजार रुपये टन दर मिळवून दिला. थेट उत्पादक ते ग्राहक अशी विक्री यामध्ये करण्यात आली.
जून २०१६ पासून ते २९ एप्रिल २०१७ या दरम्यान अमरावती येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष म्हणून काम केले. याच समितीचा नांदेड, वर्धा, यवतमाळ आणि बुलढाणा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने नियुक्ती होवून गोंदिया येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री.ठाकरे रुजू झाले आहे.