रोजगार सेवक दोषी आढळूनही कारवाई शून्य

0
126

महेश मेश्राम, आमगाव,दि.10 : तालुक्यात रोजगार सेवकांच्या अपहार प्रकरणांची तक्रार शासनाच्या कार्यालयात धुळखात असताना पुन्हा बिरसी येथील रोजगार सेवकाने कर्तव्यात कसूर केली. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे टाळून त्यांना संरक्षण पुरविण्याचे कार्य राजकीय पुढारी करीत आहे. बिरसी येथील रोजगार सेवकाला तत्काळ हटवून नवीन नियुक्त रोजगार सेवकाला कार्य सोपवण्यात यावे, यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनसेने या प्रकरणातील अपात्र ठरलेले प्रल्हाद चौधरी यांना रोजगार सेवक पदावरून कमी करून नवीन निवड झालेल्या मनोहर ठाकूर यांना रोजगार सेवकाची जबाबदारी देण्यात यावी, यासाठी खंडविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. रोजगार सेवकांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवळी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास मनसे आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याची माहिती मनसे पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिली आहे.
आमगाव बिरसी ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत रोजगार सेवक प्रल्हाद चौधरी यांच्यावर कर्तव्यात कसूर म्हणून त्यांना हटविण्यासाठी ग्रामपंचायतने १५ ऑगस्ट २0१६ ला ग्रामसभेत ठराव घेऊन ठराव सर्वसंमतीने मंजूर केले व त्या संदर्भात अहवाल प्रशासनाला पाठविण्यात आले. तर नवीन रोजगार सेवकाचा निवडीसंदर्भात ठराव संमत करून त्यांची निवड केली. परंतु या निवडीलाच प्रशासन व राजकीय पुढारी हात घालून नियमबाह्य पद्धतीने प्रल्हाद चौधरी यांनाच रोजगार सेवकांचे कार्य करण्यास दडपण घालीत आहेत. त्यामुळे प्रशासन व राजकीय पुढारी यांच्याबद्दल गावात रोष पसरला आहे.