तुमसरला हरित शहर बनविणार : प्रदीप पडोळे

0
12

तुमसर,दि.11 : शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता भविष्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता न.प. च्या वतीने तीन वर्षांत तीन हजार वृक्ष लागवड करून शहराला हरित शहर बनविणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. भंडारा वनविभागांतर्गत आयोजित हरित सेना चित्ररथाच्या स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, एस.सी.एफ. कोडापे, नगरसेवक रजनिश लांजेवार, राहुल डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी पडोळे यांनी, राज्य शासनाने वृक्षारोपणाचे महत्तव नागरिकांना पटवून देण्याकरिता चांदा ते बांदा हरितसेना चित्ररथ तयार करून राज्यात जनजागृती करीत आहे. १ जुलै ते ७ जुलैदरम्यान ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असून तीन वर्षात ५0 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ज्याप्रमाणे ठेवले आहे. त्याच धर्तीवर न.प. तुमसरचा देखील दरवर्षी हजार वृक्षाप्रमाणे तीन वर्षात ३000 वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. केवळ वृक्ष लागवड करून सोडून देणे हे उद्देश नसून प्रत्येक झाडाच्या वाढीकरिता ट्री गार्ड व पोषक खताचा वापर करून त्या वृक्षांना मोठे करण्याची प्रमाणिक जबाबदारी सर्व नगरसेवक व न.प. कर्मचार्‍यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे लवकरच तुमसर शहर हरित शहरात परावर्तीत होईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार उमाकांत राहांगडाले यांनी मानले.कार्यक्रमाकरिता लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी, माकडे व तुमसर, लेंडेझरी, नाकाडोंगरी परिक्षेत्रातील वन कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.