मुख्यमंत्र्यांनी केला बामणपेठच्या तलाव खोलीकरणाचा शुभारंभ

0
9

ग़डचिरोली,दि.१२(berartimes.com):: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोनसरी येथील लॉयड मेटल्सच्या लोहप्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील अतिसंवेदनशिल व जंगलव्याप्त बामणपेठ येथील तलावात हेलिकॉप्टर उतरवून माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषद सदस्य रूपाली पंदिलवार, सरपंच अनिता अवसरमोल, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, गंगाधर पोटवार, सुशील अवसरमोल उपस्थित होते. मात्र पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यापैकी कुणाचेही दर्शन बामणपेठवासीयांना झाले नाही.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. सिंचनासाठी २३०० विहिरी मंजूर करण्यात आल्या असून, त्यांना वीज उपलब्ध करुन दिल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. मामा तलावामुळे शेती सिंचनास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मामा तलावाची पाहणी करून योग्य दर्जाचे काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी एका शाळकरी मुलीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारले. मात्र, विद्यार्थिनीने समर्पक उत्तरे न दिल्याने दुर्गम भागातील शिक्षण क्षेत्रातील विदारक स्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. यावेळी सरपंच अनिता अवसरमोल यांनी मार्कंडा (कं) ग्रामपंचायत दत्तक घेण्याची विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.जंगलव्याप्त बामणपेठ येथे सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नीतेश गोहणे यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.