सत्यपाल महाराजावरील हल्ल्याचा ओबीसी सेवा संघ व अंनिसच्या वतीने निषेध

0
11

भंडारा,दि.21 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रचारक व समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर भ्याडपणे हल्ला करून जखमी केल्यामुळे या घटनेचा निषेध भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडाराच्या वतीने करण्यात आला. या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी शासनाने कसून तपास करावा यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर,तुळशीराम बोंदरे,वहिद शेख,आर.एम.साखरे,के.के.हुड,सुधाकर मोथलकर,प्रभाकर कळंबे,निश्चय दोनाडकर आदींचा समावेश होता.

सत्यपाल महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या विचाराचा वारसा सांगून जनजागृतीचे मोलाचे कार्य करीत आहेत.समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा, व्यसनमुक्ती दूर व्हावी यासाठी समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, डॉ.एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर समाजातील सनातनी वृत्तीच्या लोकांना हैदोस मांडला आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्यांवर सुनियोजितपणे हल्ले करणे सुरु आहे. यातच सत्यापल महाराजांवर जीवघेणा हल्ला चढवून समाजप्रबोधनाची चळवळ क्षीण करण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्रात होत आहे. या घटनेचा निषेध व या घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, प्रा.नरेश आंबीलकर, हर्षल मेश्राम, कन्हैया नागपुरे, चंद्रशेखर भिवगडे, प्रा.डी.जी. रंगारी, त्रिवेणी वासनिक, बासप्पा फाये आदी कार्यकर्ते उपस्थित होते.