जलयुक्त शिवार अभियानात यंदा ७८४ गावांची निवड

0
11

नागपूर,दि.30 : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून झालेल्या कामांमुळे भूगर्भातील जलसाठ्यात विक्रमी वाढ झाली असताना यावर्षी ७८४ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त अभियानामुळे शिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासोबतच पिकांना संरक्षित सिंचन मिळावे हा उद्देश ठेवून यावर्षी २३ हजार ७५० कामे घेण्यात येणार असून, कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यात १६२ कामांसह २८ जनवन गावांमध्ये ९,७९५ कामे घेण्यात येणार असून, यावर १३५ कोटी ९१ लक्ष रुपये खर्च होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात १११ गावांमध्ये ३,७९१ कामांवर ८७ कोटी ७२ लक्ष रुपये, भंडारा जिल्ह्यात ५६ गावांमध्ये १६८९ कामांसाठी ६० कोटी ५८ लक्ष रुपये तर गोंदिया जिल्ह्यात ६३ गावांमध्ये २,१८६ कामांवर ८७ कोटी ४६ लक्ष रुपये खर्च येणार असल्याची माहिती दिली.

विभागात मागील वर्षी नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांनी जलयुक्त मोहीमेंतर्गत राज्यात उल्लेखनीय काम केले असल्यामुळे यावर्षी पाण्यासाठी गाव स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने माथा ते पायथा या पद्धतीने तसेच जलसंधारणाच्या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून ७८४ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानासाठी ६७० कोटी ४० लक्ष रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ चा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या विविध कार्यक्रमासोबतच नदी खोलीकरणाची कामेसुद्धा याअंतर्गत घेण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यात २२० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३,४१९ कामांसाठी १५० कोटी ८४ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात १३८ कामांसह यशोदा नदी खोलीकरणासाठी सहा कामे घेण्यात आली असून, २,८७० कामांसाठी १४७ कोटी ८९ लक्ष रुपये खर्च होणार आहे.