माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते शिवसंग्राममध्ये

0
17

मुंबई दि.30 : माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते यांनी सोमवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला.रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या मोहिते यांच्याकडे शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषद या नव्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसंग्रामचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेतून दोन वेळा खासदार व अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मोहिते यांनी काम केले आहे. २०१०मध्ये त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत, काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते. मात्र क्षमता, अजेंडा असतानाही काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली जात नाही, असे त्यांनी सांगितले.

देशभरातील नेते, कार्यकर्ते सध्या भाजपा प्रवेशासाठी उत्सुक असतात. मात्र, मोहिते यांनी राष्ट्रीय पक्षाला बाजूला सारून शिवसंग्राममध्ये प्रवेश केल्याने पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसच्या धोरणामुळे राजकारणातील सहा वर्षे वाया गेली. सहा महिन्यांत शिवसंग्राम संघटनेला मजबूत करण्यास प्राधान्य देणार असून, ‘गाव तिथे शिवसंग्राम’ अशी मोहीम हाती घेणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.