भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाला ३९ गावांचा विरोध

0
14

अमरावती,दि.17- अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावती येथून भातकुली गावात करण्याचे राज्यशासनाचे आदेश अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त होताच स्थानांतरणाच्या हालचालींना वेग आले आहे.बडनेराचे आमदार रवी राणा यांनी गेल्या अनेक वर्षापासून तहसील कार्यालय स्थानांतरणासाठी प्रयत्न चालविले होते.तर दुसरीकडे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा या स्थानांतरणाला विरोध आहे.श्रीमती ठाकूर यांच्यामते हे स्थानांतरण सर्वच दृष्ट्या नुकसानदायक आहे.त्यामुळे या तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या ५३ गावांपैकी ३९ गावांनी या स्थानांतरणाला आपला विरोध दर्शविला आहे. त्यासाठी आज गावकऱ्यांनी वलगाव-दर्यापूर तसेच वलगाव-परतवाडा मार्गावर रास्त रोको केला. तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणामुळे ३९ गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना असुविधा होणार असल्याने हें स्थानांतरण थांबवावे अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी लावून धरली आहे.या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांना मात्र नागरिकांचा विरोध असल्याचे दिसून येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुली गावात स्थानांतर करावे यासाठी बडनेराचे आमदार मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत  आहेत. मात्र तिवसा मतदार संघातील काही गावं सुद्धा भातकुली तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा या स्थानांतरणाला विरोध आहे. भौगोलिक तसेच आर्थिक दृष्ट्या अमरावती येथील कार्यालय नागरिकांच्या सोयीचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन्ही मतदार संघातील ५३ गावे या तहसील कार्यालयांतर्गत येतात. ज्यापैकी ३९ गावांनी या स्थानांतरण प्रक्रियेला आपला विरोध दर्शविला आहे.