बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

0
12

तिरोडा,दि.22 : येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या(रोहयो) कार्यालयाकडे जाणारा रस्ता रेल्वे क्रासिंगनंतर खूपच उखडला असून मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पहिल्याच पावसात या रस्त्यावर पाणी साचले असून रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे येथे कित्येकांचे अपघात झाले आहेत.याच रस्त्यावरून पंचायत समिती, तहसील कार्यालय, विद्युत उपविभागीय कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यालय असल्याने या रस्त्याने हजारो नागरिकांची ये-जा असते. परंतु सदर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना काहीही देणे-घेणे नाही. कारण विदर्भ एक्सप्रेसने जाणे-येणे करीत असल्याने त्यांना या रस्त्याची गरजच पडत नाही.

मात्र शहरवासीयांना दररोज याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने त्यांची पंचाईत होते. तरी हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी जनतेची मागणी आहे.सामान्य नागरिक या कार्यालयात गेले असता साहेब मिटींगला गेले किंवा साहेब साईडवर गेले, असे सांगून गप्प केले जाते. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी तिरोडावासीयांनी केली आहे.