अमरावती येथील पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

0
13

नांदेड,दि.24 :अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या अटकेचा नांदेड येथील पत्रकारांनी निषेध केला असून पत्रकार प्रकाश कांबळे व तिवारी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्थानकाअंतर्गत येणार्‍या मोगरा गावातील एका युवतीने दि. 17 जून रोजी आत्महत्या केली. या प्रकरणातील अरोपीस त्वरीत अटक करून त्याच्यावर कारवाई करावी यासाठी पोलीस स्थानकावर जमलेल्या नागरिकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला. या प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांनाच पोलिसांनी जबर मारहाण करून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. चांदूर रेल्वे पोलीस स्थानकाचे ठाणेदार शेळके यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी ठाणेदार शेळके यांच्यावर कारवाई करावी व पत्रकार प्रकाश कांबळे यांच्यासह अभिजित तिवारी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नांदेड येथील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदनावर पत्रकार सुरेश काशिदे, विलास आडे, दिपकंर बावस्कर, सुर्यकुमार यन्नावार, अनिल मादसवार, यशपाल भोसले, सुमेध बनसोडे, सुरेश अंबटवार, गौतम गळेगावकर, विनायक कामठेकर, सुनिल कांबळे, बुद्धभुषण सोनसळे, लक्ष्मण भवरे, उदय नरवाडे, शिवाजी शिंदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.