काँग्रेस पक्षाने साजरा केला ‘कर्जमाफीचा विजयोत्सव’

0
5

 

भंडारा,दि. २6- कर्जमाफी देणे शक्य नाही असे म्हणणा-या सरकारला आज कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे. काँग्रेस पक्षाने रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची ही मागणी कायम आहे. तसेच ही कर्जमाफी देशातील आजतागायची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे म्हणणे ही राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने २००८ साली दिलेली कर्जमाफी अजूनही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे, अशी प्रतिक्रिया भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिली आहे.

भंडारा येथील स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात यावेळी आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विजयोत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने व शहरातील वातावरण तापले असल्याने आतिषबाजी करता येणार नाही अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली. परंतु विजयोत्सव साजरा करणारच अशी भूमिका काँग्रेस पक्षातर्फे घेतली अशा तनावपूर्ण परिस्थितीत अखेर विजयोत्सव साजरा करण्यात आला. आतिषबाजी करण्याकरिता मात्र पोलिसांनी मज्जाव केला. देशात गल्लीपासुन तर दिल्लीपर्यंत सत्ता आल्यापासून प्रत्येक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण तयार झाले अशी प्रतिक्रिया महेंद्र निंबार्ते यांनी व्यक्त केली.
सरकारने १ लाख ५० हजार रूपयांच्या मर्यादेत कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त कृषीपूरक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा पूर्ण लाभमिळणार नाही त्यामुळे रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांची कर्ज माफ करावीत ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ हजारांची मदत अत्यल्प आहे ती वाढवावी. आता शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नविन कर्जवाटप सुरु करावे. शेतक-यांना १० हजार रूपये मदत देताना जशा जाचक अटी घातल्या आहेत तशा अटी घालून शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवू नये. या सरकारचा पूर्वानुभव चांगला नाही. सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक राहिला आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवेल तसेच कर्जमाफी प्रत्यक्षात मिळत नाही तोवर आपला संघर्ष व सरकारवरील दबाव कायम ठेवेल, असेही काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणाले. यावेळी क्रियान्वयन समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, धनराज साठवणे, सचिन घनमारे, अनु.जाती. जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, प्रशांत देशकर, माजी नगरसेवक पृथ्वी तांडेकर, नगरसेविका जयश्री बोरकर, आशा तिवाडे, सुषमा वरगंटीवार, गणेश निमजे, हिरामण लांजेवार, शेख नबाब, जनार्धन निंबार्ते, प्रा मारबते, प्रशांत सरोजकर, विनीत देशपांडे, रवीकुमार येरखेडे, नाहीद परवेज इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.